Wednesday, September 6, 2017


       मी सकाळी सर्व आवरतो आहे. ठीक-ठाक कपडे करून पैशांचे पाकीट, घड्याळ यासोबतच आठवणीने मोबाईल घेतो आहे. कुणी बघू नये म्हणून सोन्याची जाडसर चैन शर्टमध्ये ढकलून मस्तपैकी बाईक काढून घरातले सामान आणण्यासाठी निघतो आहे. रस्ता सगळा उजाड आहे. ग्रहण असल्यासारखं सकाळ-सकाळी अंधार जाणवतो आहे. सगळे विचित्र वातावरण जाणवत आहे. तरीही मी स्वतःच्या सुट्टीवर खूष आहे. त्याचमुळे वातावरणाचा फरक पडू न देता मी तसाच पुढे चालतो आहे. अचानक एक घोळका संपूर्ण रस्ता भरून माझ्याकडे येतो आहे. मला फक्त काळ्या आकृत्या दिसताहेत. कदाचित त्यांना मी दिसलो आहे. ते त्यांची गती वाढवत आहेत.कदाचित ते झोंबी आहेत म्हणून मी दचकतो आहे. हळू हळू त्या काळ्या आकृत्या जवळ येत आहेत. इच्छा असताना देखील मी स्वतःची जागा सोडू शकत नाही; मी निश्चल झालेलो आहे. आकृत्या आता स्पष्ट होत आहेत. ते झोंबी नाहीत म्हणून मी निश्चिंत होतो आहे. पण परत त्यांच्या चेहऱ्यावर राग, चीड आणि असहायता यांचा विचित्र मिलाफ दिसतो आहे. त्यंचा त्वेष पाहून मी घाबरतो आहे. इतक्यात ते माझ्याजवळ येताहेत. माझ्यावर तुटून पडताहेत. माझे घड्याळ, चैन, पाकीट, मोबाईल त्यांनी काढून घेतले आहे. आता ते माझ्या कपड्यावर गाडीवर तुटून पडताहेत. भीतीने मीच कपडे काढून देतो आहे. गाडी आणि कपडे घेऊन ती झुंड आता पुढे जात आहे; त्यांना विद्युतरोषणाईने चमकणारी इमारत दिसते आहे. मी मात्र रस्त्यात पुन्हा एकटाच नग्न उभा आहे. मी एखादा कपडा शोधण्याची धडपड करतो आहे.

       मी आता दचकून जागा होतो आहे. इकडे-तिकडे पाहतो आहे. सगळे व्यवस्थित आहे. स्वप्नातून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे सर्व काही आवरत आहे. गरम पाण्याचा शॉवर घेतो आहे; स्वप्नाच्या धक्क्यातून दूर जात आहे. मी आता भरपेट नाश्ता करतो आहे, ठीक-ठाक कपडे करतो आहे.पैशांचे पाकीट, घड्याळ सोबत मोबाईल घेतो आहे. आता सोन्याची चैन जरा जास्तच आत ढकलतो आहे. बाईक काढून सामान आणण्यासाठी बाजारात चाललो आहे.नाक्यावर सिग्नलवर थांबलो आहे. शेजारून आवाज येतो आहे. एक बाई ढूमके वाजवते आहे. तिच्या कडेवर एक बाळ आहे. तिच्यासमोर दोन छोटी मुले दुकानात जात आहेत. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्याला रुपया मागत आहेत. तरुण पोर कुणी रुपया देत आहे, कुणी चेष्टा करत आहे. कुणी दुकानदार, पादचारी त्यांना हटकत आहेत. इतक्यात सिग्नल हिरवा होतो आहे. मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो आहे. रस्त्याने अशी बरीच मुले दिसत आहेत. मी बाजारात जातो आहे. गाडी लावतो आहे. सामान घेत आहे. पुन्हा दुसऱ्या दुकानात जात आहे. माझी पिशवी भरत आहे. इतक्यात एक काळाकुट्ट माणूस समोर येत आहे. कपडे फाटके आहेत. शरीराची दुर्गंधी येत आहे. हातवारे करून पैसे मागतो आहे. मुका-बहिरा आहे. मी त्याला हटकतो आहे. धडधाकट आहे काम-धंदा कर असा सल्ला खुणेनेच देतो आहे. पुन्हा पुढच्या दुकानात जातो आहे. माझ्या मागे एक टोळके त्या भिकाऱ्याची टिंगलटवाळी करत आहे. तू मुका नाहीस बोलून दाखव म्हणून त्रास देते आहे. नाटकं करू नको असा दम देते आहे. मी देखील हसतो आहे. पुढे जात आहे; माझी खरेदी पूर्ण होत आहे. इतक्यात तीन-चार हिजडे टाळ्या वाजवत तिथे येत आहेत. प्रत्येक दुकानात जात आहेत. टाळ्या वाजवत आहेत. दुकानदार निमुटपणे १० रुपये काढत आहेत. ते पुढच्या दुकानात जात आहेत. मी तिथून पळ काढतो आहे. आता भूक लागल्याचे जाणवत आहे. जोभेचे चोचले पुरवावेत म्हणून मी चौपाटी जवळ करतो आहे. कच्छी दाबेली घेतो आहे; खाणार इतक्यात, एक लहान मुलगी येते आहे. माझ्या हाताकडे पाहते आहे आणि फक्त हात पसरते आहे. मला पाझर फुटतो आहे मी दाबेली तिच्या हातावर ठेवतो आहे. ती आनंदित होऊन पळत जात आहे. मला ती काय करते आहे हे पहायचे आहे. मी शंकेखोर होतो आहे.मी तिच्या मागे जातो आहे. चौपाटीच्या मागे एका जुन्या इमारतीत असे फाटक्या कपड्यातले मळकटलेले असंख्य लोक दिसताहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर अजिजी आहे. तेज हरपले आहे. ती मुलगी तिच्या आईजवळ जाते आहे. सोबत आणखीन दोन छोटे भाऊ सोबत लहान बाळ आहे. सगळे दाबेलीवर तुटून पडताहेत. मला स्वप्न आठवते आहे. मी घाबर-घुबरा होतो आहे. प्रचंड वेगाने गाडी काढून घराकडे येतो आहे. रस्त्यात असे असंख्य भिकारी दिसत आहेत. त्यांची संख्या वाढत आहे.. त्यांची संख्या वाढत आहे.. स्वप्न खरे होत आहे... स्वप्न खरे होत आहे....